निवास व न्याहरी योजना- ग्रामीण महिलांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी

1.     प्रस्तावना
2.     निवास व न्याहरी योजनेची गरज
3.     रोजगाराच्या संधी
4.     पर्यटकांसाठी फायदेशीर योजना
5.     योजनेची ठळक मार्गदर्शक तत्त्वे
6.     स्थानिक घरमालकांना फायदे
7.     योजनेसाठी शुल्क प्रस्तावना
हिवाळ्यात खऱ्या अर्थाने पर्यटनाचा हंगाम सुरू होतो. नाताळच्या सुट्ट्या, नवीन वर्षाच्या सुट्ट्या आल्या की सगळेजण पर्यटनासाठी बाहेर पडतात. त्यातही आता धार्मिक पर्यटनही वाढू लागले आहे. निसर्ग पर्यटनाच्या जोडीने धार्मिक ठिकाणी जाण्यास आजकाल प्राधान्य दिले जाते. मात्र, सर्वच पर्यटनस्थळे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी नसतात. आधुनिक काळातील प्रचार-प्रसाराची, दळणवळणाची साधने विकसित झाल्याने पर्यटन उद्योगास विशेष चालना मिळत आहे. आर्थिक दृष्टिकोनातून पर्यटन उद्योग महत्त्वाचा ठरतो. असाच उद्योग आता अहमदनगर जिल्ह्यातही वाढीस लागला आहे. या वाढीस कारणीभूत ठरत आहे ती, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची पर्यटकांसाठीची निवास व न्याहरी योजना. या योजनेला आता पर्यटन राज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांच्यामुळे जिल्ह्यात चालना मिळाली आहे.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे राज्यात अनेक ठिकाणी पर्यटन केंद्र विकसित करण्यात आली असून तेथे पर्यटक संकुलेही बांधण्यात आलेली आहेत. याखेरीज अनेक ठिकाणे पर्यटन केंद्र म्हणून निश्चित करण्यात आली आहेत. तेथे पर्यटन विकासाच्या दृष्टीने आवश्यक सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. त्यासाठी पुरेशी पर्यटन संकुले उभारणे ही महत्त्वाची गरज असून ती पूर्ण करण्यासाठी महामंडळाने पर्यटकांसाठी निवास व न्याहरी योजना राबविण्याचा निर्णय घेतला आणि आता त्याची अंमलबजावणी सुरू आहे.

पर्यटनस्थळांची व्यवस्था राखणे व नवीन पयर्टनस्थळे विकसित करणे ही पर्यटनाची महत्त्वाची अंगे होत. याअनुषंगाने देशी-परदेशी पर्यटकांना आकृष्ट करणे, यासाठी नियोजनपूर्वक प्रसिद्धी यंत्रणा उभी करणे, पर्यटकांच्या वाहतुकीची तसेच निवास-भोजनाच्या सोयी उपलब्ध करुन देणे हेदेखील उद्योग महत्त्वाचे घटक ठरतात. पर्यटन उद्योगांमुळे सेवा उद्योगांना महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त झाले आहे. पर्यटनामुळे होणारा आणखी एक अतिशय महत्त्वाचा लाभ म्हणजे मोठ्या प्रमाणावर निर्माण होणाऱ्या रोजगार संधी. अशीच रोजगाराची संधी सध्या अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा, सिद्धटेक, जामखेड, शेंडी (भंडारदरा), बाभळेश्वर आदी पर्यटनस्थळी निर्माण झाली आहे. या योजनेचा लाभ उठवत जिल्ह्यातील १३ कुटुंबांनी रोजगार मिळविला आहे. विशेष म्हणजे ही योजना राबविणाऱ्यांमध्ये १३ जणांपैकी ७ जण या महिला आहेत. त्यामुळे या योजनेत महिलांच्या रोजगाराला चालना मिळाली आहे. टाकळी ढोकेश्वर येथे एक व मढी येथे चार पर्यटन संकुले प्रस्तावित आहेत.

निवास व न्याहरी योजनेची गरज
राज्यातील ऐतिहासिक, धार्मिक व निसर्ग रमणीय ठिकाणे, समुद्र किनारे याठिकाणी पर्यटकांचा ओघ वाढत आहे. त्यातही अहमदनगर जिल्ह्यात शिर्डीतील श्री साईबाबा मंदिर, अष्टविनायकांपैकी सिद्धटेकचे सिद्धविनायक मंदिर, चौंडीचे अहिल्यादेवी होळकरांचे जीवनपट असलेली शिल्पसृष्टी, मोहोटादेवी या धार्मिक स्थळांबरोबरच भंडारदरा, अहमदनगरचा भुईकोट किल्ला, चाँदबिबीचा महल, ऐतिहासिक खर्डा किल्ला, रेहकुरी येथील काळविट अभयारण्य, रंधा धबधबा, हरिश्चंद्र गड, कळसूबाईचे शिखर आदी निसर्ग पर्यटनस्थळेही आहेत. याठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक वाढत आहेत. या सर्वच पर्यटनस्थळावर पर्यटकांसाठी निवास व्यवस्था करणे शक्य नसते. तसेच काही पर्यटनस्थळे ही विशिष्ट काळातच बहरलेली असतात. त्यामुळे वर्षभर अशी व्यवस्था करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारेही नसते. यावर उपाय म्हणजे पर्यटनस्थळावरील स्थानिकांना यात सामावून घेणे होय. जेणेकरून पर्यटकांची सोय होईल आणि स्थानिकांना रोजगारही मिळेल. त्यातूनच निवास व न्याहरी या योजनेचा जन्म झाला.
ज्या ठिकाणी पर्यटकांचा ओघ फक्त काही हंगामापुरताच असतो, अशा ठिकाणी पर्यटकांची उत्तम प्रकारे राहण्याची व भोजनाची व्यवस्था या योजनेच्या माध्यमातू होत आहे. उदा. भंडारदरा, रंधा धबधबा, कळसूबाई शिखर या ठिकाणी पावसाळ्यातच जास्त प्रमाणत पर्यटकांची गर्दी होते. अशा ठिकाणी या योजनेचा जास्त प्रमाणात फायदा होतो. सध्या अहमदनगर जिल्ह्यात या योजनेतून 13 ठिकाणच्या संकुलातून पर्यटकांची सोय केली जाते.

रोजगाराच्या संधी
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अधिकृत मंजुरीमुळे घर मालकांना फायदा होतो. या योजनेत स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होतो. बऱ्याच पर्यटनस्थळाच्या ठिकाणी बंगले, घरे व फ्लॅटस रिकामे पडून असतात. किंवा अशा निवासी स्थानाचा काही ठिकाणी कायमस्वरूपी वापर केला जात नाही. अशा व्यवस्थेचा या योजनेखाली उपयोग करण्यात येत आहे. त्यामुळे स्थानिकांच्या रिकाम्या जागांचा फायदा करून घेण्यात येत आहे. विशेषत: घरातील महिलांसाठी ही रोजगाराची चांगली संधी आहे. पर्यटक संकूल निर्माण करून आपला रिकामा वेळ दिला की उत्पन्नाचे साधन निर्माण होत आहे. यातूनच अहमदनगर जिल्ह्यातील ७ महिलांनी अशी पर्यटक संकुले निर्माण करून घराला हातभार लावला आहे.
या योजनेत सहभागी झालेल्या स्थानिकांच्या जागांची माहिती पर्यटन विकास महामंडळामार्फत पर्यटकांना दिली जाते. तसेच पर्यटकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध होणाऱ्या निर्देशिकेमध्ये व महामंडळाच्या संकेतस्थळावरही (वेबसाईटवर) माहिती प्रसिद्ध केली जाते. जेणेकरून या घरमालकांना याचा फायदा होईल.

पर्यटकांसाठी फायदेशीर योजना
अनेक पर्यटनस्थळी राहण्याचा खर्च हा खूप असतो. तसेच आपल्याला पाहिजे तशा सुविधाही मिळत नाहीत. त्यामुळे पर्यटकांची गैरसोय होते. भंडारदरा, कळसूबाई शिखर, रेहकुरी अभयारण्य अशा ठिकाणी राहण्याची सोय नसते. अशा वेळी निवास व न्याहरी योजनेतून उभारलेली पर्यटन संकुले किफायतशीर ठरत आहेत.
दुसरा फायदा म्हणजे राज्याबाहेरील किंवा परदेशी पर्यटकांना स्थानिकांसमवेत राहण्याचा. त्यांची संस्कृती जाणून घेण्याची संधी मिळते व चालीरिती आणि स्थानिक खाद्यपदार्थांची ओळख होते. यातून राज्याच्या पर्यटन विकासालाही वाव मिळतो. स्वच्छ व घरगुती सोय झाल्यामुळे पर्यटकांचाही ओढा वाढेल.

योजनेची ठळक मार्गदर्शक तत्त्वे
•  अशी निवासस्थाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची मान्यता मिळवलेली असावीत.
•  
निवासस्थाने अर्जदाराच्या अधिकृत मालकीची असावीत.
•  
मान्यताप्राप्त जागी घरमालक पर्यटकांसाठी कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त दहा खाटांची सोय निर्माण करील.
•  
वास्तू स्वच्छ आणि शांत परिसरात असावी.
•  
घराची रचना आकर्षक, उत्तम आणि मजबूत बांधकामाची, सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य असावी.
•  
जागेची व्यवस्था महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने मान्य केलेल्या वर्गवारीप्रमाणे असावी.
•  
जागेवरील देखभालीसाठी आणि पर्यटकांची सोय पाहण्यासाठी घरमालक किंवा प्रतिनिधीची उपस्थिती आवश्यक असावी.
•  
महिला पर्यटकांसाठी प्रसाधनगृहाची स्वतंत्र व्यवस्था असावी.
•  
निवासी जागेत प्रथमोपचार व अग्निशमनाची व्यवस्था असावी.
•  
आकारण्यात येणारे भाडे व खाद्य पदार्थांचे दर याची माहिती घर मालकाने महामंडळास आगाऊ द्यावी.
•  
पर्यटकांची नावे, पत्ते, वेळ व तक्रारीसाठी नोंदणी बुक ठेवण्यात यावेत.
•  
घर मालकास दिलेले नोंदणीपत्र रद्द करण्याचा अधिकार महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळास राहील.
•  
नोंदणीपत्र मिळण्यासाठी घरमालकाने विहित अर्जाच्या नमुन्यामध्ये अर्ज करावा.
•  
महामंडळाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार घर नसेल तर अर्ज नाकारला जाऊ शकतो.
स्थानिक घरमालकांना फायदे
•  रिकाम्या जागेचा फायदेशीर उपयोग आणि पर्यटन विकास कामाला हातभार.
•  
महामंडळ जागेसंबंधीचा पर्यटकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध होणाऱ्या निर्देशिकेमध्ये विनाशुल्क समावेश करण्यात येईल.
•  
पर्यटन माहिती केंद्राद्वारे स्थानिक घरमालकांच्या या योजनेखाली उपलब्ध जागेची माहिती इच्छुक पर्यटकांना देण्यात येते.
•  
स्थानिक घरमालकांचा मार्केटिंग करण्याचा त्रास आणि खर्च वाचेल, कर आकारणीत वाढ होणार नाही असे प्रयत्न केले जातील.
•  
उपलब्ध घरावर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अधिकृत पर्यटन विकास महामंडळाच्या विविध पत्रकांचे माहितीसाठी वाटप करण्यात येईल.
•  
न्याहरी व निवास योजनेमुळे बऱ्याच कुटुंबांना अधिकृत रोजगार मिळणार आहे.
योजनेसाठी शुल्क
अर्जदार घरमालकास अर्जासोबत एक हजार डिमांड ड्राफ्टने शुल्क भरावे लागेल. अर्जदाराच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी करुन अहवाल तयार करून तीन महिन्यात नोंदणीपत्र देण्यात येईल.
-नंदकुमार वाघमारे, माहिती अधिकारी, शिर्डी


स्त्रोत : महान्यूज

SHARE THIS

->"निवास व न्याहरी योजना- ग्रामीण महिलांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी"

Search engine name