Entries Rights हक्क नोंदी

शेती विषयक माहिती » हक्क नोंदी.


7/12 वर कोणताही हक्क नोंदवण्यापूर्वी फेरफार नोंद केली जाते. गावदप्तरी याला गाव नमुना नं.6 - फेरफाराची नोंदवही असे म्हणतात. अनेक ठिकाणी 

हा नमुना "ड" म्हणून तर काही ठिकाणी "नोंदीचा उतारा" म्हणून प्रसिध्द आहे. फेरफाराची नोंदवही ही वास्तविक फेरफाराची दैनंदिनी आहे. जमीनीबाबतच्या 
अधिकारामध्ये जसजसा बदल होतो त्याप्रमाणे अनुक्रमाने या नोंदी घेतल्या जातात. शेतकर्‍यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा हा गाव नमुना असून त्याबाबत योग्य 
ती दक्षता व काळजी त्या त्या वेळी न घेतल्यामुळे अनेकांच्या जीवनात फेरफार घडवून आणलेली हीच ती फेरफार नोंदवही आहे.

2. नोंदीचा नमुना - फेरफार नोंदवही पुढील नमुन्यात ठेवली जाते.
नोंदीचा अनुक्रमांक
संपादन केलेल्या अधिकाराचे स्वरुप.
परिणाम झालेले भू- मापन क्रमांक व उपविभाग क्रमांक.
चाचणी अधिकार्‍यांची आद्याक्षरे किंवा शेरा.
1
2
3
4

3. नोंदीतील तपशिल कसा लिहीतात :

स्तंभ-1 : या स्तंभामध्ये फेरफार नोंदीचा अनुक्रमांक लिहीला जातो.

स्तंभ-2 : या स्तंभामध्ये हक्क प्राप्त केलेल्या व्यक्तीच्या अधिकाराचे स्वरुप लिहीले जाते. यामध्ये फेरफाराचा दिनांक, सूचना मिळाल्याचा दिनांक, व्यवहाराचे स्वरुप, संबंधीत खातेदारांची नांवे, व्यवहाराचा दिनांक, मोबदला रक्कम इत्यादी तपशिल असतो.
स्तंभ-3 : जमीनीचा व्यवहार ज्या गट नंबर किंवा सर्वे नंबरशी संबंधीत आहे, त्याचा नंबर लिहीला जातो.
स्तंभ-4 : अशाप्रकारे केलेल्या फेरफाराबद्दल संबंधीतांना नोटीस देऊन, चौकशी करुन व केलेला फेरफार बरोबर करण्यांत आला आहे याबद्दल स्वत:ची खात्री करुन प्रमाणन अधिकारी (बहुदा मंडल अधिकारी) स्तंभ-4 मध्ये योग्य तो आदेश देतात व पदनाम लिहून स्वाक्षरी करतात.



4. नोंदी कोणाकडून होतात

राज्यभर या नोंदी तलाठी मंजूर करतात असाही एक गैरसमज आहे. फेर फार नोंदी या फक्त तलाठयाकडून लिहील्या जातात. त्या मंजूर किंवा नामंजूर करण्याचा कोणताही अधिकार तलाठयास नाही.
कोणत्याही व्यक्तीला जमिनीमध्ये खरेदी खताने, वारसा हक्काने, इतर अधिकाराने, वाटपानुसार, बक्षीस पत्राने, गहाण पत्राने, देणगीने, पट्टेदार म्हणून किंवा अन्य कोणत्याही प्रकारे जमिनीमध्ये हक्क प्राप्त झाला तर अशा कागदपत्रांच्या आधारे पहिल्यांदा फेरफार नोंद लिहीली जाते व अशा नोंदी प्रमाणित झाल्यानंतरच 7/12 स अंमल दिला जातो.


5. नोंदीची मंजूरी :

नोंदी या मंडल अधिकारी किंवा सर्कल भाऊसाो हे प्रमाणित करतात. कोणतीही नोंद एकदा मंजूर किंवा नामंजूर झाल्यानंतर या नोंदीमध्ये बदल करावयाचा तलाठयास किंवा मंडल अधिकार्‍यांना कसलाही अधिकार नसतो. अनेक वेळा शेतकरी मित्र या नोंदीमधील बदल करुन देण्याचा तलाठयांकडे आग्रह करतात. नोंदी एकदा मंजूर किंवा नामंजूर झाल्या आणि ती जर आपल्याला मान्य नसेल तर अशा नोंदीविरुध्द संबंधीत प्रांत अधिकार्‍याकडे अपील केले पाहिजे. अपील किंवा फेरफार तपासणीशिवाय पूर्वी मंजूर किंवा नामंजूर केलेल्या नोंदीमध्ये बदल होऊ शकत नाही.
फेरफार नोंदीचे हे महत्व विचारात घेता, अगदी गेल्या 100 वर्षातील सुध्दा 7/12 तील बदल कशामुळे झाला हे त्या नंबरची फेरफार नोंद वाचली असता समजू शकते.



6. नोंदीच्या संदर्भात घ्यावयाची दक्षता :

(1) कोणत्याही दस्तानुसार जमिनीमध्ये हक्क प्राप्त झाल्यानंतर अशा हक्काची नोंद प्रमाणित करण्यापूर्वी सर्व संबंधीतांना नोटीस देणे आवश्यक असते. अनेक वेळा जमीन खरेदी करणारा खातेदार जरी गावातील असलातरी विकणारा माणूस परगावातील असू शकतो. त्यामुळे अशा व्यक्तींचे पूर्ण पत्ते तलाठयाकडे देणे आवश्यक आहे. अशा माणसाला नोटीस दिल्याशिवाय फेरफार नोंद प्रमाणित करण्याची प्रक्रिया कायद्याने पूर्ण होत नाही.
(2) वारसनोंदीच्या बाबतीत सुध्दा सर्व वारसांचे रहाण्याचे पत्ते देणे आवश्यक आहे.
(3) नोंद प्रमाणित होण्यापूर्वी फेरफार नोंदीतील लिहीलेला सर्व मजकूर उदा. जमीन खरेदीदार व विक्री करणार्‍या माणसाचे नांव, हस्तांतरणाचा दिवस, खरेदी खताची रक्कम, खरेदीचे क्षेत्र, गट नंबर इत्यादी तपशिल बिनचूक असल्याची खात्री कली पाहिजे.
(4) फेरफार नोंद लिहील्यानंतर व हितसंबंधीत व्यक्तींना नोटीस काढल्यानंतर किमान 15 दिवस थांबल्याशिवाय नोंद प्रमाणित होऊ शकत नाही. असे असल्यामुळे नोंद प्रमाणित होण्यापूर्वीच दुरुस्त 7/12 ची नक्कल मागणे योग्य नाही.
7. सखाराम या व्यक्तीने रघुनाथ या व्यक्तीकडून दिनांक 8.10.2000 रोजी कायदेशीर मोबदला घेऊन नोंदणीकृत दस्ताने जमीन खरेदी केली. या खरेदी खताची नोंद मात्र 5 महिन्यानंतर मंजूर झाली.
वरील उदाहरणामधील सखाराम हा खरेदी खताद्बारे खरेदीच्या दिवशी जमीनीचा मालक झाला आहे असे कायद्यानुसार मानले जाते. म्हणजेच दिनांक 8.10.2000 रोजीच सखाराम या जमीनीचा मालक झाला आहे, परंतू प्रत्यक्षात 7/12 स त्याचे नांव 4-5 महिन्यांनी नोंदविले जाते. फेरफार नोंदीद्बारे 7/12 वर नांव लागणे व जमीनीचा मालक होणे या दोन वेगवेगळया गोष्टी आहेत. कायद्यानुसार खरेदी खताच्या दिवशीच खरेदीदार हा जमीनीचा मालक होतो. परंतू काही लोक सरळ व्यवहार करीत नसल्यामुळे किंवा 7/12 वरच्या नोंदीचा गैर फायदा घेऊन अन्य तिर्‍हाईत व्यक्तीशी गैरव्यवहार करीत असल्यामुळे, प्रकरणाची गुंतागुंत टळावी म्हणून सर्वसाधारणपणे खरेदी नंतर लगेच नोंदी होण्याबाबत खरेदीदार आग्रही असतात.


8. हे लक्षात ठेवावे :

(1) 7/12 वरील कोणताही मालकी हक्काचा उल्लेख हा फेरफार नोंदीद्बारेच 7/12 वर केला जातो.
(2) केवळ अज्ञान व्यक्ती सज्ञान झाल्यानंतर फेरफार नोंद न घालता वर्दीवरुन अज्ञानाच्या पालकाचे नांव कमी करता येते.
(3) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या कलम-154 नुसार, प्रत्येक महिन्यात सब रजिस्ट्रारकडे नोंदविलेल्या सर्व व्यवहाराची माहिती (सूची-2) तहसिलदार यांचेमार्फत तलाठयास कळविली जाते व त्यानुसार नोंदी केल्या जातात.
(4) वारसाच्या नोंदी या वैयक्तिक कायद्यातील तरतुदीनुसार (प्रत्येक धर्माच्या पध्दतीनुसार) केल्या जातात.
(5) फेरफार नोंद झाल्यानंतर लगेचच त्या नोंदीचा अंमल 7/12 ला दिला जातो.
(6) इंडेक्स (सूची-2) मध्ये काही चूक झाली असल्यास खरेदी खत दाखवून सब रजिस्ट्रार कार्यालयाकडून Index दुरुस्त करुन घेता येईल.
(7) कायद्यानुसार प्रमाणित नोंद ही त्याविरुध्द सिध्द करण्यांत येईपर्यंत खरी असल्याचे मानण्यांत येते.



SHARE THIS

1 comment:

  1. मोजणी अधिकारी यांनी येउनही मोजणी न केल्यास ते कोणते पत्र देतात, ते त्यांच्याकडे कसे मागावे

    ReplyDelete

Search engine name