व्यवसायाला सुरुवात करताना
व्यवसाय करणे ही गोष्ट सोपी नक्कीच नाही. व्यवसायात पूर्ण तयारीनिशी तुम्ही उतरला नाहीत, तर त्यात तुमचे नुकसान होण्याची शक्यताच जास्त असते. नुकसान सोसायला लागू नये यासाठी व्यवसायाला सुरुवात करण्यापूर्वी पूर्वतयारी करणे हा उत्तम पर्याय आहे. त्यामुळे व्यवसायाची पूर्वतयारी कशी करावी हे पाहू. पूर्वतयारी करताना काही मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत.
• व्यवसायाचे स्वरूप आणि संधी –
आपल्या आवडीनुसार व्यवसाय निवडणे गरजेचे आहे. अन्यथा व्यवसायामध्ये मन लावून काम केले जात नाही. त्याचप्रमाणे व्यवसायाला संधी किती आहे याचा विचारही करणे गरजेचे आहे. बाजारपेठेमध्ये कोणत्या गोष्टींना सतत मागणी असते, कोणत्या नव्या संधी बाजारपेठेमध्ये उपलब्ध होत आहेत, निवडलेल्या संबंधित व्यवसायात व्यवसाय किती संधी आहे याची माहिती घेणेही महत्त्वाचे ठरते.
काही व्यवसायांसाठी तुम्हाला ग्राहकांना पटकन येता येईल अशी जागा असणे गरजेचे असते, तर काही व्यवसायांसाठी मोठे गोडावून, अथवा साठवणूक करता येईल अशी मोठी जागा असणे गरजेचे असते. अशी जागा थोडी आतल्या बाजूला असली, तरी चालते. मात्र, काही विशिष्ट व्यवसायांसाठी उदा. ग्राहकोपयोगी वस्तूंची विक्री, हॉटेल, कपडे, औषधे, सौंदर्यप्रसाधने यासारख्या व्यवसायांसाठी तुम्हाला जागेची निवड काळजीपूर्वक करावी लागते. उदा. हॉटेल व्यवसायासाठी पार्किंगच्या सोयीचा विचार करावा लागेल. अन्यथा त्याचा परिणाम व्यवसायावर होईल. त्याचप्रमाणे काही व्यवसाय घरगुती स्वरूपाचे असल्यास त्याप्रमाणे घराची रचना करून घेणे इष्ट ठरते.
व्यवसाय सुरू करताना भांडवल ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. बँकेकडून कर्ज घेऊन आर्थिक सोय करता येते. कर्ज घेतल्यानंतरही हप्ते भरण्यासाठी सुरुवातीपासूनच दक्ष राहणे गरजेचे आहे. आर्थिक शिस्त पहिल्यापासूनच लावून घेतल्यास व्यवसाय स्थिरस्थावर होऊन फायदेशीर होण्यास सुरुवात होते. कच्चा माल, जागेची किंमत या गोष्टींचा विचार भांडवल उभारणी करताना लक्षात घेणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे काही वेळा व्यवसाय सुरू करेपर्यंत कच्च्या मालाची किंमत वाढू शकते. त्यामुळे राखीव आर्थिक गंगाजळी ठेवणे गरजेचे आहे. उदा. हॉटेल व्यवसाय करायचा असल्यास, कच्च्या मालाची किंमत सतत बदलत असते. त्याशिवाय नोकरांना पगार आणि बोनस या गोष्टींसाठी योग्य ती तजवीज करणे गरजेचे आहे.
• व्यवसाय मार्गदर्शन आणि प्रशिक्षण
कोणताही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी योग्य मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे. त्यासाठी गरजेनुसार एखादा कोर्स, प्रशिक्षण वर्गाला उपस्थित राहण्याचा प्रयत्न करावा. यामधून व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक पूर्वतयारी होण्यास मदत होते.
व्यवसायासाठी योग्य ती पूर्वतयारी, धाडस आणि आर्थिक समतोल राखला तर नक्कीच यश मिळते.
Businessman Marketing Plan उद्योजकाचा मार्केटिंग प्लान
->"While the business व्यवसायाला सुरुवात करताना "
Post a Comment