पिक पहाणी.

शेती विषयक माहिती » पिक पहाणी.

कोणाच्याही जमीनीस पिक पाहणी सदरी कोणाचेही नांव लावले जाते व तलाठी हे काम करतात अशी सार्वजनिकरित्या शेतकरी किंवा खातेदार चर्चा करतांना आपण पाहतो. 1971 साली याबाबत शासनाने पिक पाहणीच्या संदर्भातील नियम बनविले व तेव्हापासून अशाप्रकारे कोणाच्याही जमीनीला दुसर्‍या कोणाचेही नांव थेट पिक पाहणीस लावण्याचे अधिकार तलाठयांना नसल्याचे स्पष्ट केले.
दरवर्षी खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात प्रत्यक्ष फिरुन पिकांची नोंद 7/12मध्ये लावली जाते. सर्वसाधारणपणे सप्टेंबर मध्ये खरीपाची व डिसेंबर अखेरपर्यंत रब्बी पिकांची पाहणी करुन नोंदी केल्या जातात.
वरीलप्रमाणे पिकांच्या निरीक्षण काळात, सर्व जमीनीच्या बाबतीत मालक हाच जमीन कसतो काय याची पडताळणी करणेदेखील अपेक्षित असते. 7/12 वर नांव असणारी व्यक्ती आणि प्रत्यक्ष जमीन कब्जात असलेली व्यक्ती एकच आहे काय याची पडताळणी तलाठयाकडून केली जाते. जमीन मालक किंवा त्याचे कुटूंबीय ही जमीन कसत असतील तर त्यांचे स्वत:चे नांव "खुद्द" या स्वरुपात 7/12 स पिक पाहणी सदरी लावली जाते. मात्र प्रत्यक्ष जमीत कब्जात असलेली व्यक्ती ही जमीन मालकापेक्षा वेगळी आहे, असे लक्षात आल्यास तलाठयाने खाली दिलेल्या गाव नमुना 14 मध्ये माहिती भरुन, या नोंदवहीचा उतारा तहसिलदाराकडे कार्यवाहीसाठी पाठविणे अपेक्षित असते.

गांव नमुना-14 : अधिकार अभिलेखात जमीन कब्जात असल्याचे मानण्यांत येणार्‍या व्यक्ती व्यतिरिक्त जमीन कब्जात असलेल्या व्यक्तिंची नोंदवही.
अ.क्र.
भूमापन अ.क्र.
भूमापन क्रमांकाचा उपविभाग
खाते क्रमांक
वर्ष.
अधिकार अभिलेखात नांव नोंदलेल्या व्यक्ती व्यतिरिक्त जमीन कब्जात असलेल्या इतर व्यक्तींचे नांव.
स्तंभ-6 मधील व्यक्तींकडे ज्या तारखेपासून जमीन कब्जात असेल ती तारीख.
शेरा
1
2
3
4
5
6
7
8
यावरुन आपल्या असे लक्षात येईल की, मालकाशिवाय दुसर्‍या व्यक्तीचे नांव 7/12 वर कूळ व खंड सदरी थेट लावण्याचे कोणतेही अधिकार तलाठयास नाहीत. वर नमुद केल्याप्रमाणे नमुना 14 मध्ये, मालकाव्यतिरिक्त जो माणूस जमीन कब्जात असल्याचा दावा करतो, त्या संदर्भातील माहिती लिहीलेली असते.

नमुना 14 मधील माहिती तहसिलदाराकडे मिळाल्यानंतर तहसिलदाराकडून त्या त्या गावातील अशा सर्व जमीनीच्या बाबतीत चौकशीच्या तारखा लावल्या जातात. चौकशीच्या तारखा, भेट देण्याची प्रत्यक्ष तारीख व वेळेची पूर्वसूचना संबंधीत खातेदारांना तसेच तलाठी यांना किमान 7 दिवस अगोदर देणे अपेक्षित आहे. पिक पाहणीच्या चौकशीच्या वेळी शेजारच्या खातेदारांना सुध्दा चौकशीसाठी गावाच्या चावडीवर उपस्थित रहाण्यास कळविले जाते.
पिक पाहणीच्या प्रकरणामध्ये जेव्हा जमीन मालक सोडून अन्य व्यक्ती, जमीन आपल्या ताब्यात आहे असा दावा करीत असतात त्यावेळी ही जमीन कशी व केव्हा ताब्यात आली, जमीनीत कोणकोणती पिके घेतली, आजरोजी कोणती पिके घेत आहेत व प्रत्यक्षात जमीन आपण कसली आहे काय याबाबतचा पुरावा देणे अपेक्षित असते. अनेक वेळा शेतकरी खातेदार हे खरेदीविक्रीचा व्यवहार कायद्यानुसार पूर्ण करु शकले नाहीतर, पिक पाहणीच्या द्बारे नाव लाऊन आडमार्गाने व्यवहार पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. वास्तविक "जमीनीचा ताबा हा जमीनीच्या मालकीपाठोपाठ आला पाहिजे" हे कायद्याचे सर्वमान्य तत्व आहे. म्हणून अगोदर मालकी कशी आली व नंतर ताबा कसा आला याबाबत पुरावा दिला गेला पाहिजे. या संदर्भात शेतकर्‍यांना खालील महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवले पाहिजेत.
(1) कूळ कायद्यानुसार "जातीने जमीन कसणे" या व्याख्येमध्ये खालील बाबींचा समावेश होतो.
(अ) स्वत:च्या अंगमेहनतीने.
(ब) स्वत:च्या कुटूंबातील कोणत्याही इसमाच्या अंगमेहनतीने.
(
क) स्वत:च्या किंवा कुटूंबातील कोणत्याही इसमाच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली मजुरीने लावलेल्या मजुरांकरवी अथवा रोख रकमेत किंवा मालाच्या रुपात परंतु पिकाच्या हिश्श्याच्या रुपात नव्हे, द्यावयाच्या वेतनावर ठेवलेल्या नोकराकरवी जमीन कसणे असा होतो. अपवाद : विधवा स्त्री, अवयस्क किंवा शारीरिक किंवा मानसिक दौर्बल्य जडलेला इसम, सशस्त्र, फौजेत नोकरी करणारा इसम, हे नोकरांमार्फत, मजुरांमार्फत कसत असतील तरी ते स्वत:च जमीन कसतात असे मानले जाते.
(2) पिकपाहणी सदरी मालकाव्यतिरिक्त दुसर्‍या व्यक्तीचे नांव हे जमीन मालकाने निर्माण केलेल्या कायदेशिर ताब्यानुसारच लावले पाहिजे. " जमिनीचा ताबा हा जमिनीच्या मालकी पाठोपाठ आला पाहिजे" हे कायद्याचे सर्वमान्य तत्व आहे.
(3) एखाद्या वर्षी मालकाव्यतिरिक्त दुसर्‍याचे नाव वहिवाट सदरी लागले म्हणजे तो आपोआप कूळ झाला असे होत नाही. कूळकायद्यानुसार कूळ व मालक यांच्यात करार होणे, कूळ व मालक असे नाते सिध्द होणे, कूळाने मालकास खंड देणे इत्यादी बाबी कूळ सिध्द होण्यास आवश्यक आहे.
कूळ कायदा कलम 32 ओ चा अशावेळी संबंध येऊ शकतो. कूळकायदा कलम- 32 ओ नुसार जमीन मालकाने 1-4-57 नंतर निर्माण केलेल्या कोणत्याही कूळवहिवाटीच्या बाबतीत, जातीने जमीन कसणार्‍या कूळास अशी कूळवहिवाट सुरु झाल्याच्या तारखेपासून एक वर्षाच्या आंत त्याने धारण केलेली जमीन मालकांकडून खरेदी करण्याचा हक्क असतो. कूळकायद्याने कूळास दिलेला हा हक्क बजावण्याची त्याची इच्छा असेल तर त्याने एक वर्षाच्या आंत त्या संबंधात जमीन मालकास व शेतजमीन न्यायाधिकरणास (तहसिलदार) विहीत रितीने कळविले पाहिजे.
(4) मालकाशिवाय दुसर्‍या व्यक्तीचे नांव वहिवाट सदरी लागल्यास अशी व्यक्ती 7/12 मधील नोंद दाखवून वहिवाटीस अडथळा येऊ नये अशी मागणी करुन दिवाणी न्यायालयातून मनाई आदेश आणू शकते व असे मनाई आदेश अनेक दिवस राहिल्यास प्रकरणात गुंतागुंत निर्माण होते.
(5) दरवर्षीची पिकपाहणी ही स्वतंत्र असते. त्यामुळे एका वर्षी पिकपाहणीला मालकाव्यतिरिक्त दुसर्‍याचे नांव लागले तरी पूढच्या वर्षी सुध्दा नमुना-14 भरुन तहसिलदार यांनी रितसर पिकपाहणी प्रकरणाची चौकशी केली पाहिजे.

SHARE THIS

->"पिक पहाणी."

Search engine name