१) कंदमाशी : या पिकास कंदमाशीसारख्या किडीचा मोठा उपद्रव होतो. या किडीची माशी डासासारखी पण आकाराने मोठी व काळसर रंगाची असते. माशीचे पाया शरीरापेक्षा लांब असतात. दोन्ही पंख पातळ व पारदर्शक असून त्यावर राखी रंगाचे ठिपके असतात. अंडी पांढरट रंगाची असतात. अळी पिवळसर असून त्यांना पाय नसतात. या किडीच्या अळ्या उघड्या गड्ड्यामध्ये शिरून त्याच्यावर उपजिवीका करतात.
याचे नियंत्रणासाठी कंदमाशा शेतामध्ये दिसू लागल्यावर माशा मारण्यासाठी क्किनॉलफॉस २५ % प्रवाही २० मि. ली. १०० लिटर पाण्यामध्ये किंवा डायमेथोएट १५ मि. ली. प्रती १० लि. पाण्यामध्ये मिसळून जुलै ते ऑगस्ट दरम्यान आलटून - पालटून १५ दिवसांच्या अंतराने फवारण्या कराव्यात. त्यानंतर क्किनॉलफॉस ५ % किंवा फोरेट १० % दाणेदार हेक्टरी २५ किलो याप्रमाणात झाडाच्या बुंध्याभोवती पसरून टाकावे व पाऊस न पडल्यास लगेच उथळ पाणी द्यावे. याच किटकनाशकाचे पुढील दोन हप्ते १ महिन्याच्या अंतराने ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये द्यावेत. अर्धवट कुजके, सडके बियाणे लागवडीस वापरू नये. जुलै ते सप्टेंबर या कालावधीमध्ये शेतात उघडे पडलेले गड्डे मातीत झाकून घ्यावेत.
२) पाने गुंडाळणारी अळी : आले पिकावर ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून ते नोव्हेंबरच्या दुसर्या आठवड्यापर्यंत या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. या किडीची अळी हिरवट रंगाची असून ती अंड्यातून बाहेर पडल्यानंतर स्वत:च्या शरीराभोवती पान गुंडाळून घेते व आत राहून पाने खाते.
किडीचा प्रादुर्भाव दिसताच गुंडाळलेली पाने गोळा करून नष्ट करावीत. तसेच कार्बारील ४० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी करावी.
३) खोड पोखरणारी अळी : ही कीड मुख्यत: जुलै ते ऑक्टोबर या काळामध्ये आढळते. या किडीची अळी छोट्या खोडाला छिद्र करते आणि त्यावर उपजिवीका करते. त्यामुळे खोड पिवळे पडून वाळण्यास सुरुवात होते. अळीने पडलेल्या छिद्रावर जाळीदार भाग दिसतो.
या किडींच्या नियंत्रणासाठी एक महिन्याच्या अंतराने १.५ मिली मॅलेथिऑन प्रति लिटर पाण्यात किंवा १.५ मिली मोनोक्रोटोफॉस याची फवारणी आलटून पालटून करावी.
सुत्रकृमी : काही भागामध्ये आले पिकावर सुत्रकृमीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. सुत्रकृमी हे पिकाच्या मुळाभोवती राहून सुईसारख्या अवयवाने मुळातील रस शोषण करतात. त्यामुळे पिकाची वाढ खुंटते व पाने पिवळी पडतात. तसेच त्यांनी केलेल्या छिद्रातून कंदकुजीस कारणीभूत असलेल्या बुरशीचा सहज शिरकाव होतो. सुत्रकृमीच्या नियंत्रणासाठी लागवडीच्यावेळी ट्रायकोडर्मा प्लस ५ किलो /हे. शेणखतात मिसळून घ्यावा किंवा फोरेट १० जी हेक्टरी २४ किलो याप्रमाणात द्यावे किंवा १८ ते २० क्विं./ हे. निंबोळी पेंडीचा वापर करावा.
->"आले लागवडीवर कीड व रोग नियंत्रण कसे करावे"