बिल गेट्स, अँडी ग्रोव आणि स्टीव जॉब्ज ही माणसं आताच्या पिढीची आयडॉल्स आहेत. मायक्रोसॉफ्ट, इंटेल आणि अॅपल या त्यांच्या कंपन्या. सारं जग या कंपन्यांची उत्पादनं वापरत आहे. त्यांच्यामागोमाग आलेल्या मार्क झुकरबर्गच्या गुगल-फेसबुकचा वापर अब्जावधी माणसं करत आहेत, जेफ बेझोच्या अॅमेझॉनवरून अब्जावधी माणसं अब्जावधी डॉलर्सची खरेदी करत आहेत. गेट्स, ग्रोव आणि जॉब्ज या गड्यांच्या कंपन्यांची किंमत एकेकाळी १.५ ट्रिलियन डॉलर्स, म्हणजे भारताच्या एका वर्षाच्या एकूण उत्पादनापेक्षाही जास्त होती. या गड्यांनी ('गडी' हा इंग्रजीतल्या 'गाय' या शब्दाचा मराठी प्रतिशब्द) जगाला वेडं करणारी उत्पादनं बाजारात कशी आणली, त्यांची रणनीती कोणती होती, त्यांनी कंपन्या कशा चालवल्या, उत्तराधिकारी कसे निवडले, ही माणसं व्यक्तिशः वागायला कशी होती इत्यादी गोष्टी लेखकांनी या पुस्तकात मांडल्या आहेत. बिल गेट्सचं सॉफ्टवेअर कसं विकसित झालं, अँडी ग्रोवची चिप (मायक्रोप्रोसेसर) कशी अधिकाधिक वेगवान होत गेली, जगाला वेड लावणारे आय पॉड, आय फोन कसे तयार झाले याची मोजक्या तपशीलासह माहिती या पुस्तकात गुंफलेली आहे. तिघांवर स्वतंत्रपणे खूप पुस्तकं प्रसिद्ध झालीत. तिघांचा तौलनिक अभ्यास हारवर्ड आणि स्लोन स्कूलमधल्या प्राध्यापकांनी प्रथमच मांडला आहे.
शिक्षण, स्वभाव, कामाची पद्धत, रणनीती, विक्षिप्तपणा, सहकाऱ्यांशी वागण्याची पद्धत, चुका करण्याची आणि सुधारण्याची पद्धत, जग बदलण्याची आणि अचाट कामगिरी करण्याची खुमखुमी, या मुद्द्यांच्या भोवती पुस्तक उभं करण्यात आलं आहे. एकेकाळी यशस्वी कसे व्हावे, चांगले कसे लिहावे इत्यादी रेसिपी सांगणारी पुस्तकं लोकप्रिय झाली होती त्याची थोडीशी आठवण या पुस्तकामुळं होते. विंडोज, इंटेल, आयपॉड, आयफोन इत्यादी उत्पादनांच्या विकासाचे टप्पे आणि माहिती पुस्तक असल्यामुळं हे पुस्तक वाचनीय, विचार करायला लावणारं आणि हाताशी ठेवावं असं झालं आहे.
पुस्तकातला एक वेधक मुद्दा आहे तो उत्पादन आणि प्लॅटफॉर्म या बद्दलचा. आयफोन हे उत्पादन जगातलं अद्वितीय व्हावं व त्यातून आपण रग्गड पैसे मिळवावेत असं जॉब्जला वाटणं हे उत्पादनपरंपरेत बसणारं होतं. त्यासाठी आयफोनला चिकटून रहाणं, त्यात इतरांना येऊ न देणं, तसं उत्पादन दुसऱ्या कोणाला करता येणार नाही इतकी आघाडी घेणं या गोष्टी जॉब्जनं केल्या. परंतु जॉब्जने नाईलाजानं तो हट्ट सोडला. डिझाइन माझं, हार्डवेअर माझं, सॉफ्टवेअरही माझंच हा अट्टाहास जॉब्जनं सोडला. इतरांच्या असंख्य अॅप्सना त्यानं वाव दिला, आयफोनच्या निर्मितीत त्यानं इतरांचे सॉफ्टवेअरही वापरले, संगीत कंपन्यांना भले जाचक का होईना, पण आपल्या आयपॅड-आयफोनमधे प्रवेश दिला. गेट्सनं विंडोज प्रणाली प्रतिस्पर्धी जॉब्जला वापरू दिली, इंटेलच्या चिप्सनाही वाव दिला आणि पर्सनल कंप्युटर तयार करणाऱ्या अनेक कंपन्यांना त्यानं आपलं सॉफ्टवेअर उपलब्ध करून दिलं. ग्रोव केवळ स्वतःच्या चिप्स २८६ पासून ते पेंटियमपर्यंत विकसित करून थांबला नाही, सॉफ्टवेअर तयार करणाऱ्यांनी, कंप्युटरनिर्मात्यांनी वेगवान चिप्सचा वापर करावा यासाठी त्यानं स्वतंत्रपणे मोहिमा चालवल्या. आपल्याच एका उत्पादनाच्या पलीकडं जाऊन संबंधित उद्योग विकसित होणं यात उद्योगाचा आणि आपल्या उत्पादनाचाही फायदा आहे हे तत्व वरील तिघंही जण स्वतंत्रपणे शिकले, तेही आपसात मारामारी करता करता, स्पर्धकाला सुमो खेळाप्रमाणं स्पर्धेबाहेर ढकलता ढकलता.
जॉब्जचं एरिकसननं लिहिलेलं चरित्र आठवतं. त्यात जॉब्जच्या दुर्गुणांसह त्याच्या अनन्यत्वाची चर्चा आहे. चरित्र असूनही ते पुस्तक उद्योगाचा अभ्यास झालं. एरिकसन हा लेखक-पत्रकार असल्यानं त्याचा भर वाचनीयतेवर होता. या पुस्तकाचे लेखक व्यवसायानं प्राध्यापक असल्यानं हे पुस्तक काहीसं पाठ्यपुस्तकासारखं झालं आहे. पण तरीही ते सॉलिड वाचनीय आहे. जॉब्ज बंडखोर होता. त्यानं माणसाचं जगणंच बदलून टाकलं. ली क्वान यू यानं सिंगापूर बदलून टाकलं. जॉब्जसारखा कोणी तरी माणूस भारतात जन्मायला हवा.
- निळू दामले
स्ट्रॅटेजी रुल्सः फाइव्ह टाइमलेस लेसन्स फ्रॉम बिल गेट्स, अँडी ग्रोव अँड स्टीव्ह जॉब्ज, लेः डेव्हिड यॉफ्फी, मायकेल कुसुमानो, प्रकाशकः हार्पर बिझनेस, पानेः २७२, किंमतः किंडल एडिशन ५ डॉलर
->"TIPS BUSINESS यशस्वी उद्योगाचे फंडे"