‘धंद्यापेक्षा नोकरी बरी’ असं म्हणणारा मराठी तरुण आता उद्योगात बऱ्यापैकी उतरलाय. भरपूर मराठी मुलं बिझनेस करत आहेत वा करण्याचा विचार करत आहेत. खरंतर ही खूपच चांगली बाब आहे. जो समाज आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल त्यालाच यापुढे सर्व बाबतीत मान असेल. (जैन समाज हे त्यातील उत्तम उदाहरण आहे. हा समाज अवघा ०.३७ टक्के असून सुद्धा भारतातील सुमारे २८ टक्के मालमत्ता या जैन बांधवांची आहे. याला एकमेव कारण म्हणजे हा समाज प्रामुख्याने उद्योगव्यवसायात आहे. भारतातील ३५ राज्यांपैकी ३१ राज्यांमध्ये या समाजाचे उद्योगधंदे आहेत. त्यांचं वास्तव्य आहे.)
आपल्या मराठी माणसाने देखील अशीच उद्योगधंद्यात झेप घ्यावी. आपला मराठी समाज आर्थिकदृष्ट्या समृद्ध व्हावा असे स्वप्न काही मराठी तरुण पाहतात. त्यातील एक प्रमुख नाव म्हणजे साईनाथ दुर्गे. पण हा तरुण फक्त स्वप्न पाहून थांबला नाही. तर त्याने आपल्या या उद्योजक झालेल्या व उद्योजक होऊ पाहणाऱ्या मराठी बांधवांसाठी एक मंच तयार केला. त्याचे नाव एमबीएक्स अर्थात ‘मराठी बिझनेस एक्सचेंझ’.
गेल्या वर्षी नेहरु सेंटर मध्ये एमबीएक्सचे पहिले पर्व गाजले. यावर्षी दुसरे पर्व उद्यापासून म्हणजे ९ नोव्हेंबर व १० नोव्हेंबर रोजी ठाण्यात रंगणार आहे. मसाला किंग धनंजय दातार, तळवलकर्सचे संचालक मधुकर तळवलकर, जाहिरातींचा राजा भरत दाभोळकर, हॉटेल इंडस्ट्रीमधलं मोठ्ठं नाव गोवा पोर्तुगिझाचे सुहास अवचट, सेंट ऍंजेलोजचे अध्यक्ष राजेश अथायडे, प्रसिद्ध शेफ तुषार देशमुख अशी त्या-त्या क्षेत्रातील बाप माणसं मार्गदर्शन करणार आहेत. ही माणसं फक्त त्यांच्या यशाचा प्रवास मांडणार नाहीत तर त्यांच्या क्षेत्रातील व्यवसायाच्या संधी, त्या कशा मिळवाव्यात याविषयी देखील संवाद साधणार आहेत. सोबत अनेक उद्योजकांच्या सेवांचे-उत्पादनांचे प्रदर्शन पाहता येणार आहे.
या कार्यक्रमाला अंदाजे ५ हजार उद्योजक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेटवर्किंगची मोठीच संधी इथे असणार आहे. ५ हजार सोडा पण तुम्हांला हव्या असलेल्या १०० उद्योजकांना जरी तुम्ही भेटलात तरी पुष्कळ व्यवसाय मिळू शकतो.
जे तरुण उद्योगात येऊ इच्छितात त्यांनी तर अशा प्रदर्शनाला आवर्जून भेट दिली पाहिजे. एकतर हा दोन दिवसांचा कार्यक्रम ‘फ्री’ आहे. एवढी दिग्गज मंडळी एकाच छताखाली भेटतील. तेथील उभारलेल्या बिझनेस स्टॉल्समधून तुम्हांला योग्य बिझनेस निवडण्याची आयडिया सुद्धा येईल. त्यामुळे जर बिझनेस करु पाहताय तर आवर्जून अशा कार्यक्रमाला गेलंच पाहिजे.
मराठी माणूस म्हटला कि तो नाटकाला-पिक्चरला जाईल. भाषणाला जाईल. अगदी वानखेडेला मॅच पहायला सुद्धा जाईल. असं एक चित्र मराठी माणसाचं आहे. आता हे चित्र जरा बदलुया. मराठी माणूस उद्योजकीय प्रदर्शनाला सुद्धा जातो. असं नवं चित्र निर्माण करुया. निदान नवीन मराठी पिढी तरी आर्थिकदृष्ट्या सक्षम करुया.
->"Job Is Better Than Business धंद्यापेक्षा नोकरी बरी"