Pune commercial & contracting Company उद्योगपती आणि कार्यकारी संचालक जोतीराव फुले




*उद्योगपती आणि कार्यकारी संचालक जोतीराव फुले*  
जोतीरावांच्या कंपनीनं केलेली महत्त्वाची कामं म्हणजे कात्रजचा बोगदा, येरवड्याचा पूल आणि खडकवासला धरणाचा कालवा होय.
जोतीरावांच्या उद्योगपती, कार्यकारी संचालक, अर्थतज्ज्ञ आणि शेअर मार्केटविषयक योगदानाकडे जाणकारांचं अद्याप पुरेसं लक्ष गेलेलं नाही.
ख्यातनाम विचारवंत डॉ. रामचंद्र गुहा यांनी जोतीरावांना आधुनिक भारताचे "शिल्पकार" मानलेले आहे. डा.बाबासाहेब आंबेडकर त्यांना गुरूस्थानी मानायचे आणि फुले यांचा वारसा आपण कायम उराशी बाळगू असे अभिमानानं सांगायचे. १९३२ साली पुण्यात बोलताना महात्मा गांधी  म्हणाले होते, "जोतीराव फुले देशके पहले महात्मा थे. असली महात्मा वोही थे."  अगदी भिन्न वैचारिक छावण्यांमधील या नेत्यांनी फुल्यांचा गौरव केलेला आहे.
जोतीरावांचा जन्म ११ एप्रिल १८२७ ला झाला. अवघ्या दहा वर्षांनी या घटनेला २०० वर्षे पूर्ण होतील. त्यांना ६३ वर्षांचे आयुष्य लाभले. कोणताही महापुरूष हा त्या काळाच्या मर्यांदांनी वेढलेला असतो. फुले द्रष्टे, योद्धा आणि समाजक्रांतिकारक असले तरी त्यांनाही काळाच्या मर्यादा होत्याच. आज त्यांचा कालातीत वारसा कोणता याचा विवेक करायला हवा. आजच्या जागतिकीकरणाच्या संघर्षशील जिवनात असे काही फुल्यांकडून आपल्याला मिळण्याची शक्यता आहे काय? असल्यास किती आणि कोणत्या गोष्टी याचा विचार करायला हवा.
जोतीरावांनी सर्वांना शिक्षण,ज्ञाननिर्मिती, कौशल्यनिर्मिती, स्त्री-पुरुष समता, जातीनिर्मुलन, संसाधनांचे फेरवाटप, धर्मचिकित्सा आणि आंतरजातीय विवाह या कार्यक्रम पत्रिकेच्या आधारे आधुनिक भारताच्या पायाभरणीचं काम केलं.
जोतीराव आयुष्यभर विनावेतन आणि विना मानधन पूर्णवेळ सामाजिक कार्यकर्ते राहिले. त्यांनी स्वकष्टार्जित संपत्ती खर्चून समाजकार्य केलं. ते 'पुणे कमर्शियल आणि कॉट्रॅक्टींग कंपनी'चे [Pune commercial & contracting Company] कार्यकारी संचालक होते. एक अव्वल दर्जाचे यशस्वी उद्योगपती, व्यापारी आणि नामवंत शेतकरी म्हणून जोतिरावांचा नावलौकिक होता. या कंपनीने धरणं, कालवे, बोगदे, पूल, इमारती, कापडगिरण्या, राजवाडे, रस्ते आदींची भव्य आणि देखणी बांधकामं केली. जोतीरावांच्या उद्योगपती, कार्यकारी संचालक, अर्थतज्ज्ञ आणि शेअर मार्केटविषयक योगदानाकडे जाणकारांचं अद्याप पुरेसं लक्ष गेलेलं नाही. जोतीराव हे स्वत:च्या तेलानं जळणारे सामाजिक कार्यकर्ते होते. वर्गणीवर समाजकार्य करण्याची प्रथा तोवर निर्माण झालेली नव्हती. स्वकष्टार्जित संपत्ती खर्चून त्यांनी समाजकार्य केलं.
‘बिल्डर’ हा शब्द आज वेगळ्या अर्थानं प्रचलित झालेला आहे. त्याला ‘आदर्श’ रूप प्राप्त झाल्यानं तो वापरताना काळजी घ्यावी लागते. जोतीराव हे मूलत: एक ‘नेशन बिल्डर’ होते. त्यांच्या कंपनीचे भागीदार असलेले वा सत्यशोधक समाजाचे सदस्य असलेले अनेक मान्यवर बांधकाम क्षेत्रावर आपली मोहर उमटवून गेले आहेत. मुंबई महानगरपालिकेची मुख्य इमारत, भायखळा पूल आणि परळचे रेल्वे वर्कशॉप, मुंबईतील अनेक कापडगिरण्या, भंडारदरा जलाशय, बडोद्याचा सयाजीराव गायकवाडांचा लक्ष्मीविलास राजवाडा, आदींची बांधकामे सत्यशोधकांनी केलेली आहेत. राजू बाबाजी वंजारी यांनी मुंबईतील टाइम्स ऑफ इंडियाची इमारत, सोलापूरची लक्ष्मी विष्णू मिल आणि लक्ष्मीदास खिमजी यांच्या मुंबईतील कापड गिरण्या बांधल्या. हे सर्वजण जोतीरावांचे निकटचे स्नेही आणि जोतीरावांच्या कंपनीचे भागीदारही होते. त्यांनी सत्यशोधक चळवळीला फार मोठे योगदान दिलेलं आहे. जोतीरावांच्या कंपनीनं केलेली महत्त्वाची कामं म्हणजे कात्रजचा बोगदा,येरवड्याचा पूल आणि खडकवासला धरणाचा कालवा होय. पूल, धरणे, कालवे, बोगदे आणि रस्ते व सुंदर इमारती यांसारखी अनेक दर्जेदार बांधकामं त्यांनी केली. त्यातून मिळविलेली रक्कम सामाजिक कामासाठी मुक्त हस्ते खर्चून टाकली.


जोतीरावांच्या या कंपनीतर्फे पुस्तक प्रकाशनाचंही काम केलं जाई.  बौद्ध विचारवंत अश्वघोष यांच्या वज्रसूची या जगप्रसिद्ध ग्रंथावर आधारित पुस्तक तुकाराम तात्या पडवळ यांनी १८६५ साली लिहिलं. जोतीरावांनी ते ‘जातीभेद विवेकसार’ प्रकाशित केलं. या कंपनीचं पुण्यात पुस्तकविक्री केंद्र होतं.
सोन्याचे दागिने बनविण्याचे साचे विकण्याची एजन्सी जोतीरावांकडे होती.
ही कंपनी भाजीपाला विक्री व पुरवठा यांचेही काम करीत असे.
एक अव्वल दर्जाचे यशस्वी व्यापारी, उद्योगपती आणि नामवंत शेतकरी म्हणून जोतीरावांचा नावलौकिक होता. सामाजिक कार्यकर्ता आणि यशस्वी उद्योगपती असा संगम फार विरळाच म्हटला पाहिजे.
कितीतरी मोठी कामं या कंपनीमार्फत त्यांनी केल्याच्या कागदोपत्री नोंदी मिळालेल्या आहेत. १५० वर्षांपूर्वी कृषी-औद्योगिक शिक्षणाचा आग्रह धरणारे फुले हे आधुनिक भारताच्या कृषी-औद्योगिक प्रगतीचे द्रष्टे शिल्पकार ठरतात. भारतीय कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांना पहिली कामगार संघटना बांधायला जोतिरावांचेच प्रोत्साहन होते.


नेल्सन मंडेला आणि बराक ओबामा भारत भेटीवर आलेले असताना आपण त्यांना फुले यांनी  १८७३ साली  [१४४ वर्षांपुर्वी ] लिहिलेल्या "गुलामगिरी" ह्या ग्रंथाचा इंग्रजी अनुवाद भेट दिला. ते दोघेही भाराऊन गेले. फुले यांनी हे पुस्तक निग्रोमुक्तीच्या चळवळीला अर्पण केलेले आहे. संपुर्ण आशिया खंडातील हा एकमेव विचारवंत आहे की ज्यानं दिडशे वर्षांपुर्वी विचारांचं जागतिकीकरण केलेलं होतं.


डॉ. जी.एस.घुर्ये आणि डॉ. एम.एन.श्रीनिवासन यांच्या अनेक वर्षे आधी महात्मा जोतीराव फुले यांनी भारतीय समाजाचं विशेषत: जातीव्यवस्थेचं ज्या पद्धतीनं शास्त्रीय विश्लेषण केलं होतं ते पाहता, जोतीराव हेच आद्य भारतीय समाजशास्त्रज्ञ ठरतात. त्यांचं हे लेखन आंतरराष्ट्रीय दर्जाचं आहे.

*प्रा. हरी नरके*
.......................
संदर्भ 1. आम्ही पाहिलेले महात्मा फुले, महाराष्ट्र शासन, मुंबई, 1993
2, महात्मा फुले - शोधाच्या नव्या वाटा, महाराष्ट्र शासन, मुंबई, 1998
3. महात्मा फुले - समग्र वांड्मय, महाराष्ट्र शासन, मुंबई, 1991

SHARE THIS

18 comments:

  1. I found so many interesting stuff in your blog especially its discussion. From the tons of comments on your articles, I guess I am not the only one having all the enjoyment here! keep up the good work... click here

    ReplyDelete
  2. What a man Mahatma Phule... Thta why he is Mahatma ...

    ReplyDelete
  3. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
  4. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
  5. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
  6. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
  7. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
  8. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete

Search engine name