विद्युत सुरक्षा - आपली रक्षा

महाराष्ट्र शासनाच्या ऊर्जा विभागामार्फत दि.11 ते 17 जानेवारी 2018 या कालावधीत राज्यभर विद्युत सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. वीजेची सुरक्षा हा एक महत्त्वाचा विषय आहे. यासाठी या सप्ताहाच्या निमित्ताने जनजागृतीसाठी हा लेख..

आपण आपल्या घरी, कार्यालयात, शेतात हमखासपणे वीज वापरतो. तसेच विद्युत उपकरणे आणि बिघाड झाली असेल तर वेळोवेळी वायरींगही बदलून घेतो. अशा वेळी काही महत्वाच्या बाबी आणि सूचनांचे पालन केले पाहिजे. तर निश्चितच सुरक्षिततेचा उपाय होऊ शकतो. कटु प्रसंग झाल्यास प्राण हानी टळू शकते. तेव्हा पाहूया काही महत्वपूर्ण सूचना...

योग्य विद्युत साहित्य
सर्व विद्युत वायर्स, केबल्स व साहित्य योग्य क्षमतेचे व योग्य इन्सुलेशनचे वापरा. विद्युत सर्किटवर क्षमतेपेक्षा जास्त भार टाकू नका. फ्यूज तार योग्य क्षमतेची वापर किंवा योग्य क्षमतेची एमसीबी वापरा. जेणे करुन अतिभार किंवा शॉर्टसर्किटमुळे धोका होणार नाही. वायरींग करताना प्लेट अथवा रॉडची अर्थींग करावी. वायरींगसाठी वापरण्यात येणारे साहित्य, विद्युत उपकरणे आय.एस.आय.चिन्ह असलेली किंवा दर्जा नियंत्रण मंडळाने प्रमाणित केलेली वापरावीत. अर्थलिकेज पासून होणारा धोका टाळण्यासाठी ई.एल.सी.बी लावावी. मीटर रुम स्वच्छ व मोकळी ठेवा. तिचा वापर स्टोअर रुम करिता करु नका. तसेच तिथे ज्वालाग्राही वस्तू ठेवू नका व योग्य वायूविजन व्यवस्था ठेवा. विजेची उपकरणे खरेदी करताना अर्थींगची व्यवस्था असलेलीच तीन प्लगची उपकरणे खरेदी करा.
त्याचप्रमाणे न्युट्रल वायर करिता उघड्या वायरचा वापर न करता इन्सुलेटेड वायरचाच वापर करा. एका सॉकेटमध्ये अनेक प्लग्ज घालू नका. तात्पुरते वायर्स लावू नका. योग्य पद्धतीचा अवलंब करा. दुरुस्ती केलेली वायरींग तसेच जोडणी दिलेले वायर्स, केबल्स वापरु नका आपली वायरींग व अर्थींग कार्यक्षम ठेवण्यासाठी वेळेच्या वेळी तपासून घ्या. सॉकेटमध्ये खुली वायर काडीचा वापर करुन न लावता तीन पीन प्लग टॉपचा वापर करावा. सर्व विद्युत उपभोक्यांनी तसेच बांधकाम व्यवसायिकांनी विद्युत वायरींग मान्यता प्राप्त विद्युत ठेकेदाराकडूनच करुन घ्यावी. 15 मीटरपेक्षा उंच इमारतीचे बाबतीत विद्युत पुरवठा सुरु करण्यापुर्वी सदर इमारतीतील वायरींग योग्य असल्याबाबत विद्युत निरीक्षकाकडून प्रमाणित करुन घ्यावी. हे नियमानुसार बंधनकारक आहे. हे लक्षात ठेवा.

अपघात झाल्यास...
कुठेही विद्युत अपघात घडल्यास संबधित निरिक्षकास प्रथम सूचना द्या. आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार पुढील कारवाई करा. शॉर्टसर्कीटमुळे आग लागल्यास प्रथम मेन स्विच बंद करा. विद्युत रोधक अग्निशामकाचा वापर करा. पाण्याचा वापर टाळा. विद्युत वाहक वायरचा कपडे वाळविण्यासाठी उपयोग करु नका. विजेच्या तारांखाली किंवा विहित अंतरापेक्षा जवळ घर अथवा कोणतेही बांधकाम करु नये. चालू विद्युत लाईनवर काम करताना हँडग्‍लोव्हज सेफ्टी शूज यासारख्या सुरक्षा साधनांचा वापर करुन इन्सुलेटेड अवजरांचा वापर करा. कोणत्याही परिस्थितीत धातूची लांब सळई, पाईप मेजरींग रोड अथवा तत्सम उंच वस्तू उपरी विद्युत वाहकाच्या सान्निध्यात येणार नाही. याची काळजी घेणे आवश्यक असते. वीज वाहिन्यांच्या खाली अत्यंत ज्वालाग्राही रसायनांनी भरलेले ट्रक, टँकर आदी कोणत्याही परिस्थितीत उभे करु नये.

विद्युत कायदा 2003विद्युत ग्राहकांनी आणि वीज पुरवठादारांनी विद्युत कायदा 2003 व त्याअंतर्गत तयार करण्यात आलेल्या नियमांचे पालन करावे. ज्यांना विद्युत वाहिन्यांजवळ कायम अथवा तात्पुरत्या स्वरुपाचे नव्या इमारतीचे बांधकाम किंवा जुन्या बांधकामात फेरबदल करण्याचे काम अथवा रस्त्याची उंची वाढवायची असल्यास त्यांनी खालील सूचनांचे कटाक्षाने पालन करावे.

• अशा बांधकामाची तपशिलवार माहिती संबधित विद्युत पुरवठादार व विद्युत निरिक्षक कार्यालयास देणे जरुरीचे आहे.
• अशा बांधकामांना सुरुवात करण्यापूर्वी संबधित सत्रातील महाराष्ट्र शासनाच्या विद्युत निरिक्षकाकडून प्रस्तावित बांधकामाचे विद्युत वाहिन्यांपासून अंतर विद्युत नियमानुसार असल्याचे प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक असते.
• अशा ठिकाणी काम करणारे कर्मचारी वीज वाहिन्यांपासून सुरक्षित अंतरावरुन काम करत आहेत याची दक्षता संबंधितांनी घेणे आवश्यक आहे.

बहुमजली इमारतीतील विद्युत संच
केवळ मुंबईच नव्हे तर राज्यातील अनेक महत्वपूर्ण शहरांमधून बहुमजली इमारतींचे बांधकाम होत असून त्या ठिकाणी नक्कीच विद्युत पुरवठा होतो. त्यामुळे अशा सर्व ठिकाणी सुरक्षिततेच्या काही सूचनांचा उपयोग होऊ शकतो.

15 मीटरपेक्षा उंच इमारतीतील (पाच मजल्यांपेक्षा उंच) विद्युत संचमांडणीस विद्युत पुरवठा करण्यापुर्वी ती विद्युत निरीक्षक कार्यालयाकडून तपासून घेऊन त्यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे. विद्युत संच मांडणीची उभारणी करण्यापुर्वी त्याचे तपशीलवार नकाशे विद्युत निरिक्षक कार्यालयाकडून मंजूर करुन घ्यावे व सुरक्षित ठेवावे. अकस्मिक घटनेवेळी त्याचा उपायोग करुन धोका टाळता अथवा कमी करता येऊ शकतो. केबल डक्टरमधून इतर कोणतेही पाईप उदा.फायर फायटींग, गॅस इत्यादी नेवू नये त्यामुळे आग विद्युत धोका निर्माण होऊ शकतो. इमारतीतील‍ विद्युत संचमांडणी योग्य प्रकारे योग्य त्या आयएसआय प्रमाणकांप्रमाणे उपकरणे वायर्स वापरुन शासन मान्यताप्राप्त विद्युत ठेकेदाराकडून उभारण्यात यावी. जेणेकरुन आग आणि विद्युत धोका निर्माण होणार नाही. यासाठी इतारतीचा मालक तसेच सोसायटीचे पदाधिकारी जबाबदार असतात.

तसेच सदनिकेतील वायरिंग करताना कमीतकमी एक पॉवर सर्किट तसेच फ्रिज, वॉशिंग मशिनसाठी वेगळे आणि लाईट, पंख्यांसाठी वेगवेगळे नियंत्रक स्विच वापरावे. विद्युत पुरवठा बिंदूजवळ सर्व विद्युत फेज चालू-बंद करु शकणारा स्विच जमिनीपासून 1.70 मिटर उंचीपर्यंत बसविण्यात यावा. इमारतीतील प्रत्येक सदनिकेस किमान दोन कार्यक्षम अर्थींग जोडव्या व ईएलसीबी बसविणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्युत शॉक लागून अपघात होण्याचा धोका पूर्णत: टाळता येऊ शकतो.

उपरोक्त सर्व सूचनांचा विचार करावा, या सूचना लक्षात ठेवाव्यात आणि आपली सुरक्षा जपावी.
-संकलन: डॉ.राजू पाटोदकर, मुंबई.
माहिती स्रोत: महान्युज


https://ift.tt/eA8V8J from Social Welfare Feed https://ift.tt/2AmZ04A

SHARE THIS

->"विद्युत सुरक्षा - आपली रक्षा"

Search engine name