मुद्राच्या साथीने उभारले उमेदीचे हात


सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील हुमरमळा गावातील पल्लवी द्वारकानाथ बांदेकर यांनी मुद्रा बँक योजनेच्या माध्यमातून पोल्ट्री व्यवसाय वाढविला आणि त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. जाणून घेऊया इतरांसाठीही प्रेरणादायी ठरणाऱ्या त्यांच्या या यशकथेविषयी...

पल्लवी या पूर्वी खाणावळ चालवत असत. त्यामध्ये त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसाबसा चालत होता. वडिलांचे अचानक निधन झाले. त्यांची पेन्शनही मिळत नाही. कुटुंबामध्ये पलव्वी सह आई, भाऊ, बहीण व एक भाचा अशी पाच माणसे.. कुटुंबाच्या उदनिर्वाहासाठी त्यांनी खाणावळीचा व्यवसाय सुरू केला खरा, परंतु तेवढ्यावर कुटुंबाचा गाडा हाकणे शक्य नव्हते. काहीतरी वेगळा मार्ग शोधणे गरजेचे होते.

साधारणत: वर्षभरापूर्वी त्यांना मुद्रा बँक योजनेविषयी जिल्हा उद्योग केंद्रातून माहिती समजली. या योजनेतून त्यांनी घरीच सुरू असणारा कुक्‍कुट पालनाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू करण्याचे ठरवले. या योजनेतून त्यांनी 1 लाख 65 हजारांचे कर्ज उभारले व कुक्‍कुट पालनाचा व्यवसाय वाढवला. यामध्ये त्यांनी ब्रॉयलर तसेच गावठी कोंबड्यांचा व्यवसाय सुरू केला आहे. बी.कॉम पर्यंत शिक्षण झालेल्या पल्लवी यांना यामुळे चांगला रोजगार प्राप्त झाला. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मोठा हातभार लागला. ही योजना अतिशय उपयुक्त असल्याचे पल्लवी यांनी सांगितले. तसेच या योजनेच्या मंजूरीसाठी कागदपत्रांचा कोणताही त्रास झाला नसल्याचेही पल्लवी म्हणाल्या.

नवीन व्यवसाय सुरू केल्यामुळे सध्या आपली आर्थिक परिस्थिती सुधारली असून, बचतीचे प्रमाणही वाढल्याचे त्यांनी सांगितले. खाणावळीच्या उत्पन्नाचा विचार करता सध्या उत्पन्नामध्ये दुपट्टीने वाढ झाल्याचेही त्या म्हणाल्या. या योजनेमुळे फक्त नवीन व्यवसायच सुरू झाला नाही तर आर्थिक सुबत्ता आली. ही योजना आपल्यासाठी उपयुक्त व फायद्याची ठरल्याचे सांगून गरजू आणि होतकरू तरुणांसाठी मुद्रा बँक योजना खऱ्या अर्थाने आयुष्याला सकारात्मक वळण देणारी योजना आहे, असे पल्लवी म्हणतात.

पल्लवी बांदेकर यांच्या या अनुभवातून मुद्रा योनजेच्या माध्यमातून युवा पिढी कशी उद्योजक बनू शकते याचे उत्तम उदाहरण पहावयास मिळते.

-जिल्हा माहिती कार्यालय, सिंधुदूर्ग
माहिती स्रोत: महान्युज


SHARE THIS

->"मुद्राच्या साथीने उभारले उमेदीचे हात"

Search engine name