जमीन मालमत्तेचे हस्तांतरण कसे होते?
१) वारसनोंद : मृत व्यक्तीचा मृत्यूचा दाखला अर्जास जोडून अर्ज करून वारसनोंद अभिलेखात लावता येते. वारस नोंदीबाबत वाद-विवाद उत्पन्न झाला तर महसुली किंवा दिवाणी न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे वारस नोंद होते. मात्र दिवाणी न्यायालयाचा आदेश अंतिम मानला जातो.प्रथमत: फक्त वारसाहक्कासाठी अर्जास मृत व्यक्तीचा मृत्यूचा दाखला, मृत व्यक्तीशी नाते व वारसाहक्काचा कायदा लक्षात घेऊन धर्माच्या वैयक्तिक कायद्यानुसार वारसांची नोंद अभिलेखात केली जाते.
२) जमिनीचे वाटप : शेतजमिनीचे वाटप कायदेशीर वारसांच्या परस्पर संमतीने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 85 अन्वये मे. तहसीलदार यांचेकडे अर्ज करून करता येते. शेतजमिनीच्या सरसनीरस वाटपासाठी मोजणीखात्याची उपअधीक्षक तालुका भूमी अभिलेख यांची मदत घेतली जाते. कायदेशीर वारसांनी परस्पर संमतीने नोंदणीकृत दस्ताने योग्य ती फी भरून केलेले वाटप योग्य आहे. पण जमीन-मालमत्तेच्या वाटपाबाबत वारसांमध्ये वाद असेल तर दिवाणी न्यायालयाच्या निकालाने झालेले वाटप अंतिम असते. वारसनोंद सोडून रुपये शंभर किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीच्या मालमत्तेचे हस्तांतरण प्रामुख्याने नोंदणीकृत दस्ताने केले जाते.
३) खरेदीखत : रु.100/- किंवा त्यापेक्षा जास्त किंमत असलेल्या मालमत्तेचा खरेदी करार-खरेदीखत नोंदविलेल्या दस्ताने करावा.
४) गहाणखत : गहाणखत नोंदविलेल्या दस्ताने केले जाते. गहाणखताची नोंद 7/12 उताऱ्यावर इतर अधिकार सदरात केली जाते.
५) कुळहक्क : कुळाचा हक्क प्रथमत: फक्त तहसीलदार यांच्या हुकुमाने प्राप्त होतो. भाडेपट्टा व लीव्ह अँड लायसन्स करार नोंदविलेल्या दस्ताने करावा.
६) बक्षीसपत्र : नोंदविलेल्या दस्ताने केले जाते. बक्षीसपत्र काही अटी घालून नोंदविता येते.
७) दत्तकपत्र : दत्तक घेण्याची प्रक्रिया दत्तकविधानाच्या कायद्याने केली आहे का? हे तपासल्यानंतर दत्तकपत्र कायदेशीर-ग्राह्य मानावे. दत्तक घेण्याची प्रक्रिया प्रत्येक धर्मात कोणती आहे त्याची माहिती मिळवा.
८) पोटगी : हा हक्क न्यायालयाच्या हुकुमाने प्राप्त झालेला असावा.
९) हक्क सोड : मोबदला घेऊन किंवा मोबदला न स्वीकारता केलेले हक्कसोडपत्र नोंदविलेल्या दस्ताने केलेले असावे.
१०) अदलाबदल : मालमत्तेची अदलाबदल नोंदविलेल्या दस्ताने करावी.
११) मृत्युपत्र : फक्त स्वकष्टार्जित मालमत्तेबाबत मृत्युपत्र करता येते. मृत्युपत्र नोंदविलेच पाहिजे असे नाही. साध्या कागदावर मृत्युपत्र लिहिता येते. मृत्युपत्राच्या प्रत्येक पानावर मृत्युपत्र करणाऱ्याने स्वाक्षरी/सही करावी. ज्या व्यक्तींना किंवा त्यांच्या वारसांना मृत्युपत्रातील मालमत्तेचा लाभ होणार नसेल अशा दोन त्रयस्थ व्यक्तींची मृत्युपत्रावर साक्षीदार म्हणून सही असावी. मृत्युपत्र तयार करणारी व्यक्ती मृत्युपत्र लिहितेवेळी मानसिकदृष्ट्या सक्षम असल्याचा डॉक्टरचा दाखला हा मृत्युपत्रावरच घ्यावा. मृत्युपत्र लिहिणारी, करणारी व्यक्ती मृत झाल्यानंतर मृत्युपत्राचा परिणाम/अंमल सुरू होतो.
मृत्युपत्राच्या सत्यतेबाबत दिवाणी न्यायालयात दावा दाखल करावा. न्यायालयाकडून प्रोबेट सर्टिफिकेट प्राप्त केलेले मृत्युपत्र खरे मानले पाहिजे.
मृत्युपत्राने स्थावर मालमत्ता प्राप्त झालेल्या व्यक्तीने पुढील हस्तांतरण करण्यासाठी आपल्याशी संपर्क साधला असेल तर ज्या मृत्युपत्राबाबत न्यायालयाने प्रोबेट सर्टिफिकेट संमत केले आहे, अशा मृत्युपत्रात नमूद केलेल्या मालमत्तेबाबत हस्तांतरणाचा व्यवहार करावा कारण न्यायालयाने प्रोबेट दिल्यानंतर मृत्युपत्रातील लाभधारकांना मृत्युपत्रातील संपत्तीचा लाभ निर्वेधपणे घेता येतो.
१२) जप्त मालमत्ता : जप्त मालमत्तेच्या लिलावात भाग घेऊन मालमत्ता खरेदी करायची असेल तर अशी मालमत्ता जप्तीची प्रक्रिया संबंधित कायद्यात घालून दिलेल्या पद्धतीने झाली आहे का? ते तपासावे. मालमत्तेचा लिलाव न्यायालयाच्या हुकुमाने केला जात असेल तर लिलावात भाग घेण्याआधी निकाल गुणवत्तेवर तपासून लिलावात भाग घ्यावा.
१३) भागीदारी संस्थेची मालमत्ता : जर एखादी मालमत्ता भागीदारी संस्थेची असेल तर सर्व भागीदार मिळूनच हस्तांतरण व्यवहार करू शकतात. इतर भागीदारांनी मिळून एका भागीदाराला प्रत्यक्ष नोंदणीकृत कुलमुखत्त्यारपत्र (रजिस्टर्ड पॉवर ऑफ ऍटर्नी) दिली असेल तरच त्या व्यक्तीशी हस्तांतरण व्यवहार करावा. भागीदारी कायद्यातील तरतुदींचा अभ्यास करून भागीदारी संस्थेला असलेली सर्व देणी, कर्ज यांची माहिती मिळवून व्यवहार करावा.
१४) सहकारी संस्था : सहकारी संस्था कायदा 1960 व नियम 1961 नुसार सहकारी संस्थेत स्वत:ची मालमत्ता योग्य ते निकष, सर्वसाधारण सभेचा ठराव आणि विभागीय सहकार निबंधकाची पूर्वपरवानगी घेऊन हस्तांतरित करता येते.
१५) मुस्लीम देवस्थान : मुस्लीम देवस्थान/पीराची मालमत्ता वक्फ बोर्डाची पूर्वपरवानगी घेऊन हस्तांतरीत करता येते.
१६) ख्रिश्चन देवस्थान : ख्रिश्चन धर्मीयांच्या चर्चच्या मालमत्तेचे हस्तांतरण करण्याआधी द बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट 1950 प्रमाणे धर्मादाय आयुक्त व संबंधित ख्रिश्चन पंथाच्या धर्मगुरूची पूर्वपरवानगी घेऊन कायद्यातील सर्व प्रक्रिया पार पाडून करता येते.
१७) न्यासविषयक (ट्रस्ट) : न्यासविषयक (ट्रस्ट) कायद्याने नोंदणीकृत केलेल्या संस्थेची मालमत्ता धर्मादाय आयुक्तांच्या पूर्वपरवानगीने व न्यासविषयक कायद्यातील तरतुदींनी हस्तांतरित करता येते.
१८) कंपनीची मालमत्ता : कंपन्यांची मालमत्ता कंपनी कायदा, कंपनीचे मेमोरंडम व आर्टिकल्स ऑफ असोसिएशन मधील तरतुदींचा अभ्यास करून हस्तांतरित करावी.
१९) दिवाळखोर मालमत्ता : दिवाळखोराच्या मालमत्तेच्या हस्तांतरणाचे सर्व अधिकार योग्य त्या कोर्टरिसिव्हरकडे अबाधित असतात, म्हणून दिवाळखोराशी मालमत्तेबाबत व्यवहार करू नये.
->"Transfer of landed property जमीन मालमत्तेचे हस्तांतरण कसे होते? "
Post a Comment