🐣 *दोन हजारची कोंबडी ते १०० कोटींचा पोल्ट्री फार्म*
Two thousand chickens to 100 crore poultry farm
दिलीपचे बाबा शंकर पाथरे महाडच्या नाते गावात किराणा मालाचं दुकान चालवायचे. दिलीपची आई सुलोचना दिलीपच्या बाबांना खंबीरपणे साथ देत होत्या. दिलीपचं शालेय शिक्षण नातेमध्येच झालं. पुढे वाणिज्य शाखेची पदवी त्याने महाडच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातून मिळवली. दिलीप शिक्षणात तसा यथातथाच होता मात्र, तो कधीच नापास झाला नाही. प्रकृती अस्वास्थ्यामुळे शंकर पाथरेंना दुकान नीट चालवता येईना. परिणामी, आर्थिक ओढाताण व्हायला लागली. दिलीप घरात सगळ्यात मोठा भाऊ.
दिलीपने कॉलेजमध्येच असल्यापासून निरनिराळे उद्योग केले. नातेमध्ये त्याने स्वामी विवेकानंद वाचनालय सुरु केले. महाडवरुन तो पुस्तके आणायचा. एक पुस्तक एक रुपया प्रति माह त्याला मिळे. १० पैसे प्रतिदिन असे तो पुस्तके वाचण्यास वाचकांना देई. त्यातून बर्यापैकी कमाई व्हायची. त्यानंतर त्याने भावासोबत ‘तृप्ती कोल्डड्रिंक्स’ नावाने गोटी सोडा विकण्यास सुरुवात केली. कालांतराने एका वर्तमानपत्रात त्याने एक जाहिरात पाहिली. रिफिल तयार करणार्या कंपनीची जाहिरात होती ती. त्या कंपनीने कच्चा माल देऊन त्याला रिफिल बनवायला शिकवले. वर्षभरात त्यातलं गणित न जमल्याने ते दिलीपने बंद केलं.
१९७३ मध्ये दिलीप बी.कॉम झाला. त्यावेळेस पुणे विद्यापीठांतर्गत रायगडमधली विद्यालये यायची. त्यामुळे दीक्षान्त पदवीदान समारंभ पुण्याला व्हायचा. मात्र, पुण्याला जाण्याएवढे पैसे दिलीपकडे नव्हते. एवढंच काय तर पोस्ट खर्च २० रुपयेसुद्धा द्यायला पैसे नव्हते. दिलीपची ही आर्थिक विवंचना महाविद्यालयाच्या प्राचार्यांना कळली. त्यांनी त्यास ‘प्रोव्हिजनल सर्टिफिकीट’ दिले, जे कोणत्याही नोकरीसाठी मान्यताप्राप्त होते. पदवी मिळाल्यानंतर नोकरीसाठी दिलीप मुंबईत राहणार्या आपल्या मावशीकडे आला. एक वर्ष काही नोकरी मिळाली नाही. त्यानंतर कुलाब्यात एक टीव्ही तयार करणारी कंपनी होती, तिकडे नोकरी मिळाली. आठ रुपये रोज. त्यातपण जर सोमवार ते शनिवार असे सगळे दिवस भरले, तरच रविवारचा दिवस भरुन मिळायचा. शिवडी ते तत्कालीन व्हीटी स्टेशन त्यानंतर पायी चालत गेट वे ऑफ इंडिया असा दररोज दिलीप प्रवास करायचा. व्हीटी स्टेशनपासून बस होती, पण १० पैसे तिकीट असायचे. तेवढेच पैसे वाचायचे. एक वर्ष काम केल्यानंतर १९७५ साली आयकर विभागात कारकून म्हणून दिलीपला नोकरी मिळाली.
त्यानंतर तीन वर्षांनी दिलीपचं लग्न भारती राजाराम रेडिज या महानगरपालिकेत शिक्षिका असलेल्या सुशिक्षित तरुणीसोबत झालं. दिलीपचं मुंबईत घर नव्हतं तरी पण त्याच्यावरील विश्वासापोटी अरुणा व राजाराम यांनी आपल्या मुलीचा हात त्याच्या हातात दिला. राजाराम काकांची टॅक्सी होती. दिलीप दिवसा नोकरी करुन संध्याकाळी टॅक्सी चालवत असे. त्यातून दिवसाला १५० रुपये मिळायचे. ५० रुपयाचं इंधन, ५० रुपये टॅक्सी मालकाला आणि उरलेले ५० रुपये दिलीपला मिळे.
वैश्यवाणी समाज हा उद्योजकीय स्वभावाचा असल्याने व्यापार-उद्योग जणू त्यांच्या रक्तातच भिनला आहे. मग दिलीप पाथरे हे वेगळे कसे असतील म्हणा. नोकरीपेक्षा उद्योग त्यांना खुणावत असे. १९८७ साली त्यांचा मित्र जयराज खामकर यांचे मेव्हणे तत्कालीन नगरसेवक अरविंद बने यांची पोल्ट्री फार्म होती. ते पाहण्यास दोघेपण गेले. त्यावेळेस कळले की, जागा जर असेल तर कमी खर्चात हा उद्योग करता येतो. दिलीपचे सासरे राजाराम यांनी त्यांची अलिबागची जागा द्यायची तयारी दर्शवली. दिलीप आणि जयराज यांनी प्रत्येकी दोन हजार रुपये गुंतवून कुक्कुटपालन व्यवसायास सुरुवात केली. पाच रुपयाला एक याप्रमाणे ४०० कोंबड्यांची पिल्ले आणली. उरलेल्या २ हजारात बाकीचा खर्च केला. व्यवसायास चांगली सुरुवात झाली. कालांतराने जयराज खामकरांनी बागायती व्यवसाय सुरू केला. त्यात ते व्यस्त झाले. त्यामुळे त्यांनी कुक्कुटपालनातून भागीदारी मागे घेतली. दिलीप यांचे लहान बंधू प्रशांत हे व्यवसाय पाहू लागले.
काळ पुढे सरकला. दिलीपना दोन मुले ओंकार आणि कुणाल. ओंकारने आयटीमधून इंजिनिअरिंग करुन पदव्युत्तर शिक्षणासाठी लंडन गाठले. तिथे नोकरीनिमित्ताने राहिला. दुसरा मुलगा कुणाल बी.कॉम झाला. कुणालला जिमची भारी आवड. काही जिम्समध्ये ‘फिटनेस ट्रेनर’ म्हणूनसुद्धा त्याने काम केलं होतं. भविष्यात जिम सुरु करायची त्याच्या डोक्यात होतं. जिमच्या व्यवसायात तेवढी प्रगती नाही, हे दिलीप पाथरेंना कळत होतं. त्यांनी कुणालला जवळ घेऊन समजावलं. या क्षेत्रातील दिग्गज विकी गोरक्ष पाथरेंचे मित्र होते. त्यांनीदेखील कुणालला मार्गदर्शन केले. पुण्याला ‘डॉ. बी. व्ही. राव इन्स्टिट्यूट ऑफ पोल्ट्री मॅनेजमेंट अॅण्ड टेक्नॉलॉजी’ ही कुक्कुटपालनाचे शास्त्रोक्त धडे देणारी संस्था आहे. या संस्थेत कुणालने प्रवेश घेतला. तेथील सहा महिन्यांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. २००५ मध्ये त्याने ‘कुकुचकू पोल्ट्री फार्म’च्या दैनंदिन व्यवसायात लक्ष घालण्यास सुरुवात केली, तर ओंकार २०१८ मध्ये लंडनहून परतला. तोसुद्धा हा व्यवसाय पाहतो. ओंकारची पत्नी प्रिया दंतवैद्य आहे, तर कुणालची पत्नी विनीता पोल्ट्री फार्मच्या अकाऊंटची जबाबदारी सांभाळते. सोबत दिलीप पाथरेंचे पुतणे प्रसाद अनिल पाथरे हा मार्केटिंग, तर श्रेयस प्रशांत पाथरे गाड्या व ट्रान्सपोर्टची जबाबदारी सांभाळतो. त्याची ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमधील पदवी जमेची बाजू ठरली.
सध्या ३५० हून अधिक लोकांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष ‘कुकुचकू पोल्ट्री फार्म’ रोजगार देते. १४ हजार टन वार्षिक उत्पादन देते. सात ते आठ लाख पक्ष्यांची या फार्मची क्षमता आहे. ‘कुकुचकू पोल्ट्री फार्म’ची उलाढाल १०० कोटींच्या घरात आहे. त्यांची शेतकर्यांना मदत करणारी योजना अफलातून आहे. ज्या शेतकर्याकडे किमान तीन हजार चौरस फूट जागा असेल, तो वार्षिक दोन लाखांवर उत्पन्न सहज घेऊ शकतो. सकाळी आणि संध्याकाळी फक्त दोन तास त्यासाठी त्याला द्यायचे आहे. कुक्कुटपालनाचे प्रशिक्षण, माहिती, कोंबडीची पिल्ले, त्यांचं खाद्य, औषध असं सारं काही ‘कुकुचकू’ पुरविते. आतापर्यंत त्यांनी रायगड, ठाणे, पुणे येथील ४०० च्या वर शेतकर्यांना अशाप्रकारे स्वावलंबी केले आहे. दिलीप पाथरे सध्या तरुणांनी उद्योगाकडे वळावे यासाठी त्यांना मार्गदर्शन करतात. छोटेखानी वाचनालय, कोल्ड ड्रिंक्सचा गाडा, रिफिलचा व्यवसाय ते १०० कोटींची उलाढाल असलेला कुक्कुटपालनाचा व्यवसाय व्हाया टॅक्सी ड्रायव्हर आहे. दिलीप पाथरेंचा हा प्रवास निव्वळ प्रेरणादायी नसून थक्क करणारासुद्धा आहे.
🎯 व्यवसाय साक्षर व्हा....
🎯 उद्योजक बना.....
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Content number or email address babyaraje5591@gmail.com dya
ReplyDelete